गदिमा नवनित
  • आईलाही विसरुन जाती या देशातील पिले अडाणी,चल सोडून हा देश पक्षिणी!
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांचे किस्से | General Articles
  •  
  • Box-C-36
  • ‘मृत्युंजय’कारांचा जन्म
  • Birth Of Author Shivaji Savant
  • श्रीधर माडगूळकर | Shridhar Madgulkar


  •  

    मग तुम्ही आमच्या कोल्हापूरचेच आहात म्हना की !’’

    आपल्या निळ्या कोचावर ऐसपैस बसत गदिमा खास कोल्हापुरी हेल काढून म्हणाले आणि समोरच्या खुर्चीतील तरुण
    आश्चर्याने त्यांच्याकडे नुसता बघतच राहिला.‘गीतरामायण’कार आधुनिक वाल्मिकी गदिमांचे आता अस्सल कोल्हापुरी माणसात रूपांतर झाले होते. वय आणि अनुभवामुळे चेहर्‍यावर आलेला गंभीर प्रौढपणाचा मुखवटा

    ‘कोल्हापूर’ या जादूई नावाने केव्हाच गळून गेला होता. एव्हाना हातातल्या अडकित्याने रोठा सुपारीचे छान कतरी सुपारीत रूपांतर केले होते.

    ‘‘सुपारी खाणार का ?’’
    ‘‘नाही. नाही.’’

    समोरच्या तरुणाच्या मनावरील ‘ग.दि.माडगूळकर’ या नावाचा दबदबा अजूनही उतरला नव्हता. त्याने घाबरत घाबरत आपल्या हातातील कागदाचे जाडजूड बाड गदिमांच्या हातात दिले.

    ‘‘ही माझी पहिली कादंबरी आपण नजरेखालून घातलीत तर बरे होईल.’’

    ‘‘हं !’’ असे म्हणून गदिमांनी ते कागदाचे बाड उचलून जरासे चाळल्यासारखे करून शेजारच्या टेबलावर ठेवले. एव्हाना
    तो समोरचा डोक्यावर तिरकी राखाडी रंगाची कॅप घातलेला,पोलीस किंवा वनखात्यातला अधिकारी वाटाणारा रुबाबदार तरुण,त्याने नुकतीच नम्रपणे हातात दिलेली त्याची पहिली कादंबरी हे सर्व क्षणभर विसरून गदिमा केव्हाच मनाने त्यांच्या कोल्हापूरमधल्या उमेदवारीच्या काळात पोहोचले होते.

    कोल्हापूरचा ‘रंकाळा’ तलाव, त्या तलावाशेजारील भालजी पेंढारकरांचा ‘जयप्रभा स्टुडिओ’, तिथे उमेदवारीच्या काळात मारलेले
    हेलपाटे, चेहर्‍यावर मेकपमनने चढविलेला पहिला रंग, शाहुपुरीतील वाण्याच्या बंद दुकानासमोरील अनेक भुकेल्या रात्रींना आसरा देणारी लाकडी फळी, शिवाजी पेठेतील बाबूराव फडतर्‍यांचे कटिग सलून, तिथे जमणार्‍या मित्रमंडळींनी दिलेले प्रोत्साहन... सारे सारे गदिमांच्या डोळ्यांसमोर क्षणार्धात तरळून गेले.

    ‘‘माझ्या कादंबरीचे स्क्रीप्ट आपण डोळ्यांखालून घालाल ना ?’’

    या त्या तरुणाच्या आर्जस्वी स्वराने गदिमा झट्कन भानावर येत म्हणाले,

    ‘‘कोल्हापूरला गेलात की तेवढा आर.के.ला माझा नमस्कार सांगा.’’

    ‘‘हो सांगतो ना.’’ असे म्हणत त्या तरुणाने परत एकदा गदिमांना खाली वाकून नमस्कार केला.गदिमांकडे नजर जाताच त्याला त्यांचा चेहरा जरा गंभीरच वाटला. आतापर्यंत अनेक मान्यवर लेखकांना, प्रकाशकांना त्याने ते कादंबरीचे बाड आशेने वाचायला दिले होते. त्यातल्या अनेकांना महिना-दीड महिना लावूनही एकतर ती कादंबरी वाचायला वेळ झाला नव्हता, नाहीतर अजून सुधारणेला खूप वाव आहे ती करून नंतर माझ्याकडे या असे काहीतरी मोघम गोलमाल उत्तर देऊन अनेकांनी त्यांना हळुवारपणे पण कटवलेच होते. गदिमांकडूनही अशाच काहीतरी उत्तराची मनात अपेक्षा धरूनच तो तरुण परत माघारी फिरला होता.

    मात्र सुारे एक महिन्यानंतर त्या तरुणाने पंचवटीच्या प्रांगणात पाऊल टाकले तेव्हा एक वेगळा सुखद अनुभव त्याची वाट पाहात होता....बंगल्याच्या फाटकातून आत शिरताच,

    ‘‘या राजे ! कोल्हापूरहून कवा आलात ?’’ असे आपलेपणाचे खणखणीत आवाजात स्वागत सदरेवरून झाले. समोर साक्षात् गदिमा... पांढरेशुभ्र धोतर... त्यावर पिवळसर सिल्कचा नेहरू शर्ट आणि त्यावर रुबाबदार खादीचे जाकीट घालून बाहेर जाण्याच्या तयारीतच उभे होते.

    ‘‘आता कसली आपल्या कादंबरीवर चर्चा होणार ? गदिमा तर बाहेर निघालेले दिसतायत. निदान त्यांनी आपली संपूर्ण कादंबरी वाचली तरी असेल का ?’’ असे निराशाजनक विचार त्या तरुणाच्या मनात डोकावण्याच्या आत अण्णांनी शेजारचा फोन उचलला.

    कुठला तरी फोन नंबर फिरवून म्हणाले, ‘‘कुलकर्णीमास्तर, एक स्थळ आलंय. मुलगी नाकीडोळी नीटस आहे. आम्हाला आवडली. बघा तुम्हाला पसंत पडतेय का ?’’

    ‘‘द्या पाठवून. तुम्हाला आवडली ना मग झालं तर’’ असे समोरून उत्तर आले असावे. आणि फोन ठेवला गेला. गदिमा त्या तरुणाकडे वळले आणि म्हणाले, ‘‘कॉन्टिनेंटलच्या अनंतराव कुलकर्णीना भेटा. मुलगी नाकी डोळी नीटस आहे.’’ या दोन वाक्यांचा आपल्या मनाशी अन्वयार्थ लावत त्या तरुणाची पावले कॉन्टिनेंटल प्रकाशनाच्या ऑफिसकडे वळली.

    मराठी वाङयाच्या प्रांतात एक नवा इतिहास घडत होता. गदिमांच्या शिफारशीने आलेल्या त्या कादंबरीच्या बाडाने साहित्याच्या प्रांतात एक नवे युग निर्माण केले.

    ‘मृत्युंजय’ या कादंबरीने मराठी साहित्यातील लोकप्रियतेचे व खपाचे सर्व विक्रम मागे सारले. या एकाच कादंबरीने ‘शिवाजी सावंत’ या कोल्हापूरच्या मर्दानी तरुणाचे ‘मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत’ या दिग्गज साहित्यिकात रूपांतर झाले. आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे या कादंबरीचे प्रकाशनही नंतर गदिमांच्याच शुभहस्ते झाले.


गदिमा गौरव | Special Quotes
  • बा.भ.बोरकर
    वस्तुत: माडगूळकरांचे गीतरामायण प्रभूरामचंद्र सिंहासनस्थ झाल्यावर सुरनरांच्या जयजयकारांत संपते. पण माडगूळकरांची प्रतिभा ते तिथे संपवित नाहीत...छंद आणि स्वर विराम पावले तरी तिचे तेज सरणारे दु:ख आपल्या अंतरात रेंगाळतच रहाते.यथाकाळ या रामायणाने पुन्हा नवा अवतार घ्यावा म्हणूनच तर त्यांच्या हातुन हे घडले नसेल?एवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखील!.
संबंधीत लेख | Related Articles