गदिमा नवनित
  • दैवजात दु:खें भरतां दोष ना कुणाचा
    पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा
मराठी युनिकोड फॉन्ट
  • काय वाढले पानावरती!
  • Kai Wadhale Panawarti
  • सुमित्र माडगूळकर | Sumitr Madgulkar


  •   
    पुणे म्हंटले की ज्या मोजक्या गोष्टी समोर येतात त्यात शनिवारवाडा हा असतोच,रथसप्तमीच्या मुहूर्तावर पुण्यात पेशवे मंडळींनी मोठ्या थाटामाटात या वाड्याची वास्तुशांत केली,असे म्हणतात की या वाड्याची पाहणी झाली तो शनिवार होता,पायाभरणी झाली तोही शनिवार होता व वास्तुशांत व गृहप्रवेश झाला तोही शनिवार!,त्यामूळे या वाड्याचे नावे 'शनिवार वाडा' असे ठेवण्यात आले.

    शनिवारवाड्याच्या बांधकामची जवाबदारी पुण्याच्या खाजगीवाल्यांकडे होती,सरदार अण्णासाहेब खाजगीवाले यांच्यावर गदिमांनी पोवाडाही लिहिलेला आहे,सरदार खाजगीवाले यांच्या पोवाड्यात पेशवाईतल्या जेवणाचा थाट वर्णिलेला आहे,पेशव्यांनी 'जेवणावळीत' राज्य घालवले असे गंमतीने म्हणतात,खरे खोटे याचे अभ्यासकच जाणोत,पण जेवणावळ तरी कशी असे याचे जबरदस्त वर्णन गदिमांनी आपल्या या कवितेत केले आहे,हे वर्णन वाचताना वाढलेले भरगच्च घमघमीत पानजर तुमच्या डोळ्यासमोर नाही आले तरच नवल!,अगदी मराठमोळे जेवणाचे ताट कसे वाढावे याचेही हे एक उत्कृष्ट उदाहरणच आहे.

    काय वाढले पानावरती!

    काय वाढले पानावरती,ऐकून घ्यावा थाट संप्रती
    धवल लवण हे पुढे वाढले,मेतकूट मग पिवळे सजले
    आले लोणचे बहु मुरलेले,लिंबू कागदी रसरसलेले

    किसुन आवळे मधुर केले,कृष्णाकाठचे वांगे आणले
    खमंग त्याचे भरित केले,निरनिराळे चटके नटले
    चटण्यांचे बहु नवे मासले,संमेलनचि त्यांचे भरले

    मिरची खोबरे तीसह ओले,तीळ भाजुनी त्यात वाटले
    कवठ गुळाचे मिलन झाले,पंचामृत त्या जवळी आले
    वास तयांचे हवेत भरले,अंतरी अण्णा अधीर जाहले!

    भिजल्या डाळी नंतर आल्या,काही वाटल्या काही मोकळ्या
    काही वाटुन सुरेख तळल्या कोशिंबिरीच्या ओळी जमल्या
    शुभ्र काकड्या होत्या किसल्या,मुळा कोवळा मिरच्या ओल्या

    केळी कापून चकल्या केल्या,चिरुन पेरुच्या फोडी सजल्या
    एकरुप त्या दह्यात झाल्या,भाज्या आल्या आळू-घोसाळी
    रानकारली वांगी काळी,सुरण तोंडली आणि पडवळी

    चुकाचाकवत मेथी कवळी,चंदन बटवा भेंडी कवळी
    फणस कोवळा हिरवी केळी,काजुगरांची गोडी निराळी
    दुधी भोपळा आणि रताळी,किती प्रकारे वेगवेगळी

    फेण्या,पापड्या आणि सांडगे,कुणी आणुनी वाढी वेगे
    गव्हल्या नकुल्या धवल मालत्या,खिरी तयांच्या शोभत होत्या
    शेवायाच्या खिरी वाटल्या,आमट्यांनी मग वाट्या भरल्या

    सार गोडसे रातंब्याचे,भरले प्याले मधुर कढीचे
    कणीदार बहू तूप सुगंधी,भात वाढण्या थोडा अवधी.........

    नंतर पंचपक्वान्नांची गर्दी उडणार म्हणून येथेच थांबणे योग्य!,गदिमांची लेखनशैली किती चित्रात्मक होती याचे हे एक सुंदर उदाहरण!.


गदिमा गौरव | Special Quotes
  • पु.ल.देशपांडे:
    महाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत.इतर काहीही देण्यार्‍या माणसापेक्षा समाजाला गाणे देणार्‍या माणसाचे उपकार फार मोठे असतात.'Song has the longest life' अशी एक म्हण आहे.एक गाणे माणसांच्या पिढ्यानुपिढ्या बांधून ठेवते. एवढेच कशाला?.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे?.मराठी नाट्यसृष्टीत जी कामगिरी कै.देवलांनी केली,त्याच तोलामोलाचे कार्य माडगूळकर यांनी मराठी चित्रसृष्टीत केले आहे...म्हणूनच आम्ही सर्व माडगूळकर कलावंशाचे वारसदार ('Madgulkar Boys') आहोत,हे सांगायला मला अभिमान वाटतो.
संबंधीत लेख | Related Articles