गदिमा व पुल ही नावे माहित नाहित असा मराठी माणूस सापडणे कठीण!,पण त्यांच्या आयुष्यातही काही गमतीशीर प्रसंग घडतात त्यापैकीच एक.२००३ साली शरद पवारांनी बारामतीत गदिमांच्या नावाने मोठे सभागृह बांधले,त्याच्या उदघाटन प्रसंगी आम्हा माडगूळकर कुटुंबियांना मोठे आग्रहाचे निमंत्रण होते,त्याच वेळी शरद पवारांनी सांगितलेला हा किस्सा.
बारामतीतील साहित्यमंडळातर्फे एक
कार्यक्रम घेण्याचे ठरले होते,प्रमुख पाहुणे म्हणून ग.दि.माडगूळकर व पु.ल.देशपांडे यांना आणायचे ठरले,दोघांनी ते मान्यही केले,दोन मोठे साहित्यिक आपल्याकडे येणार म्हंटल्यावर बारामतीकर ही खुश होते.त्याच वेळी बारामतीतून उदयास येणारे तरुण राजकीय व्यक्तिमत्व म्हणून दोघांना आणायची जवाबदारी शरद पवारांवर टाकण्यात आली.
दोन मोठ्या लोकांना आणायचे म्हणजे त्यांना एस.टी तर टाकून आणता येणार नाही,त्यासाठी गाडी पाहिजे,पण सर्वात मोठी पंचाईत म्हणजे त्यावेळी शरद पवारांकडे गाडी नव्हती! (परत वाचलत वाक्य?,अहो खरच नव्हती हो!).पण शरद पवारच ते त्यांनी एका श्रीमंत बागायतदाराला पकडले व त्याची गाडी मिळवली.ठरल्याप्रमाणे दोघे आले,कार्यक्रम अतिशय सुंदर झाला.
दोघांना परत सोडण्यासाठी पवार त्यांना घेऊन निघाले,ज्या बागायतदाराची ती गाडी होती त्याला ही अचानक शहरात काही काम निघाल्यामुळे तोही बरोबर निघाला,टिपीकल व्यापारी असतात ना तसा तो होता जाडजूड,काळाकुट्ट अगदी अंधाराच्या सावली सारखा,हाताच्या पाचही बोटात सोन्याच्या आंगठ्या,गळ्यात चेन.
पवारांनी दोघांची ओळख करुन दिली "हे ग.दि.माडगूळकर व पु.ल.देशपांडे मोठे लेखक आहेत हं!","बरं बरं नमस्कार नमस्कार!" बागायतदारांनी ओळख करुन घेतली.मग हवापाण्याच्या गप्पा सुरु झाल्या.गप्पा रंगात आल्या आणि अचानक बागायतदार महाशयांनी Bomb च टाकला "माडगूळकर व देशपांडे साहेब पण नक्की तुम्ही करता काय हो?" (म्हणजे धंदापाणी वगैरे असेल,लेखकाला खरच पैसे मिळतात का? व तो पोट कसे भरतो हा सामान्य माणसांना प्रश्न पडणे स्वाभाविक आहे,आणी हे महाशय तर हाडाचे व्यापारी बागायतदार!),आता आली का पंचाईत,गदिमा
अती कोपिष्ट,आता दोघे काय Reaction देतात याची पवारांना चिंता वाटू लागली. पण पुल शांतपणे उत्तरले "हे माडगूळकर आहेत ना ते पोस्टाच्या बाहेर बसुन लोकांना चिठ्या लिहून देतात व मी त्यांच्या शेजारी बसुन छत्र्यांच्या काड्या दुरुस्त करतो!".
हा झाला अर्थात विनोदाचा भाग!,धान्याची कोठारे भरणार्याला कदाचित माहितही नसेल की येणार्या अनेक पिढयांसाठी मराठी साहित्यात अशी लाखो कोठारे ज्यांनी भरुन ठेवली आहेत असे दोन साहित्यिक आपल्याबरोबर आहेत
गदिमा गौरव | Special Quotes
ग.दि.माडगूळकर(यवतमाळ,साहित्य संमेलनातील भाषणातून)
गीत गायले जाते एवढया अपराधासाठी त्याच्या अंगावरची कवित्वाची भूषणे काढून कशासाठी घ्यायची? काव्यहीन गीते लिहिली जातात,तशी काव्यहीन कविताही पुष्कळ असते.पण छंदात रचलेली एखादी कविता कोणी तालस्वरावर गायली तर तिच्यातील कवित्व नाहीसे झाले असे कसे? माझ्यासारख्या एकाद्या कविला काव्य स्फुरते
तेच छंदासह....