गदिमा नवनित
  • मरण-कल्पनेशी थांबे तर्क जाणत्यांचा
    जरामरण यांतून कोण सुटला प्राणिजात?
    दु:खमुक्त जगला का रे कुणी जीवनांत?
मराठी युनिकोड फॉन्ट
  • गदिमांचा अंगठा!
  • Thumb Of Gadima
  • सुमित्र माडगूळकर | Sumitra Madgulkar


  •   
    तुम्ही लहानपणी एकलव्याच्या अंगठ्याची गोष्ट नक्की ऐकली असेल,पण मग गदिमांचा अंगठा हा काय प्रकार आहे हा प्रश्न नक्कीच पडला असेल!.

    "पंचवटी",पुणे अर्थात गदिमांच्या बंगल्यात नातेवाईक व गदिमांच्या चाहत्यांचा स्नेहमेळा जमला होता,कारण तसेच होते आज 'लोकमान्य टिळक प्रतिष्ठान' व 'पुणे ऐतिहासिक वास्तू स्मृती समिती' मार्फत गदिमांच्या वास्तूवर निलफलक

    लावण्यात येणार होता.या संस्थेमार्फत पुण्यातील नामवंतांच्या घरावर असे निलफलक लावण्यात येतात.

    अनेक नामवंत उपस्थित होते,कार्यक्रम छान पार पडला,एक अनोळखी गृहस्थ मात्र तिथेच घुटमळत होते,शेवटी हिंमत करुन ते आम्हाला भेटले व म्हणाले "मी डॉ.अमूक अमूक.......तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे..पण हिंमत होत नाहीये.....".

    डॉ. सांगू लागले ....."१५ डिसेंबर १९७७ ची गोष्ट आहे,आमच्या एका नातेवाईकाचे अचानक निधन झाले,त्यामूळे वैकुंठ स्मशानभूमित जावे लागले,तिकडे एका ठिकाणी हारांचा मोठाच्या मोठा ढिग पडला होता...मला वाटले कोणीतरी मोठी व्यक्ति नक्कीच गेली असणार,मी चौकशी केली तर कर्मचारी म्हणाले अरे तुम्हाला माहित नाही काल १४ तारखेला गदिमा गेले...."

    मला याची काहिच कल्पना नव्हती त्या काळात 'ब्रेकिंग न्युज' वगैरे प्रकार नव्हता आणि मी पुण्याच्या बाहेर होतो,मला खुप हळहळ वाटली....गदिमांचे अंतिम दर्शन मी घेऊ शकलो नाही निदान त्यांच्या अस्थिचे दर्शन तरी घ्यावे म्हणून त्या हारांच्या ढिगार्‍या जवळ गेलो.एका महाकवीची ती चिता होती,चितेचे मी मनोभावे दर्शन घेतले व परत फिरणार तोच माझे लक्ष्य त्यांच्या अस्थिंकडे गेले व माझे अंग शहारुन गेले...राखेत त्यांचा उजव्या हाताचा अंगठा पडला होता,मी डॉ. असल्या मुळे उजव्या अगंठा मी बरोबर ओळखला...एकदम गदिमांची गाणी..कविता..चित्रपट....गीतरामायण माझ्या डोळ्यासमोरुन तरारुन गेले.....

    हाच तो अंगठा ज्याने अनेक गाणी...चित्रपट...कविता लिहिल्या ....

    "नाच रे मोरा....." सारखे आपले बालपण सामावणारे बालगीत लिहिले
    "इंद्रायणी काठी देवाची आळंदी......" सारखा अभंग लिहिला...
    "बुगडी माझी सांडली ग........" सारखी लावणी लिहिली...
    "दैवजात दुखे: भरता दोष ना कुणाचा...." सारखे आयुष्याचे सत्य लिहिले....

    हे सर्व लिहिणारा हाच तो गदिमांचा अंगठा...डॉ. सांगत होते "मी क्षणभर स्तब्ध झालो.. कोणी आपल्याकडे बघत नाही ना याची खात्री करुन गदिमांचा तो अंगठा ऊचलला....".
    देवांना देव्हार्‍यात जपावे तसा हा अंगठा मी बर्षानूवर्ष जपला....तो टिकावा म्हणून एक विशिष्ठ प्रकारचे केमीकल लागते व ते सतत बदलावे ही लागते,ते खास परदेशाहून आणत होतो...
    पण एकदा सलग वर्षभर मला परदेशी जावे लागले व परत आलो तर तो अंगठा खराब झाला होता....

    "या गोष्टिची सल अनेक वर्ष माझ्या मनात होती...आज हिंमत करुन तुम्हांला सांगितली...मी तुमचा अपराधी आहे,पण यामागे गदिमांबद्दल माझे अफाट प्रेम हेच एकमेव कारण होते."
    डॉ. ची गोष्ट संपली होती,त्यानंतर ना ते एक शब्द बोलू शकले ना आम्ही...एखाद्याच्या अस्थी चोरणे म्हणजे अक्षम्य गुन्हा..पण या चाहत्या बद्दल आम्ही निशब्द होतो.
    कारण गदिमा जितके आमचे होते तितकेच ते त्यांचेही होते...प्रत्येक मराठी माणसाचे होते...

    सखे सोबती गेले पुढती या आपल्या लेखात पु.ल.देशपांडे म्हणतात....
    "महाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत.इतर काहीही देण्यार्‍या माणसापेक्षा समाजाला गाणे देणार्‍या माणसाचे उपकार फार मोठे असतात. 'Song has longest life' अशी एक म्हण आहे.एक गाणे माणसांच्या पिढयानुपिढ्या बांधून ठेवते एवढेच कशाला?.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंत:करण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली,तमाशाच्या फडात,देवळात,शाळेत,तरुणांच्या मेळाव्यात,माजघरात,देवघरात,शेतामळ्यात,विव्दज्जनपरिषदेत...माडगूळकरांचा वावर कुठे नाही..."

    शेवटी एकच सांगावेसे वाटते "आपल्या मनात जिथे पवित्र व सुंदर गोष्टी वास करतात तिथे गदिमांचे स्थान आहे..."

    "चंदनी चितेत जळाला चंदन...
    सुगंधे भरुन मर्त्यलोक..."