साधारणतः १९५३ च्या सुमारास पुण्याला स्वतंत्र नभोवाणी केंद्र निघाले. श्री सीताकांत लाड नावाचे यांचे मित्र कार्यक्रम नियोजक म्हणून पुण्याला आले. नभोवाणीसाठी काहीतरी सातत्याने लिहावे, असा त्यांनी यांना खूप आग्रह केला. कातळाखालचा झरा एकदम वर उसळावा, तशी इतके दिवस रामायण लिहिण्याची यांची सुप्त इच्छा वर उसळली. संदर्भासाठी कुठल्याही रामायणाचे एकही पान
न उघडता यांनी पहिले गीत लिहिले. गीत रामायणाची छप्पन्न पदे रचताना यांना एक गीत सोडून, कधीच त्रास झाला नाही.
एका रात्री मात्र यांना गीतच सुचेना. मी पंचवटीच्या मागच्या अंगणात तुळशीकट्यावर यांची बैठक घालून दिली. बराच वेळ गेल्यावर मी त्यांना विचारले,
"काय झालं का गीत?"
तसे ते म्हणाले, "नाही, प्रसूतीवेदना होतायत"
मध्यरात्रही उलटली. पहाटेची वेळ होत आली. मी विचारलं,
"काय झालं ?"
तशी ते म्हणाले, "अगं घाई काय करतेस ? राम जन्माला यायचाय. तो काही अण्णा माडगूळकर नव्हे. तेव्हा वेळ हा लागणारच."
आणि सकाळपर्यंत एक सुरेख गीत जन्माला आलं,"राम जन्मला ग सखी.."
सकाळी लवकर उठून मला बैठकीची खोली स्वच्छ करून, उदबत्त्या लावून, फुलं फ्लॉवरपॉटमध्ये रचून तयार ठेवावी लागे. अर्थात एवढं करूनही स्फूर्ती येइलच याची खात्री नसे. गोंधळ होईच. त्यांना कुठंही गीतं सुचत. खुर्चीत, रेल्वेत, वरच्या हॉलमध्ये, माडगूळ गावी. अशा विविध ठिकाणी त्यांनी सुचेल तशी गीत रामायणाची गाणी लिहिली आहेत. ही गीतं लिहितांना त्यांची नेहमी घाई व्हायची. तारांबळ उडायची, पण वेळ पाळायचे. बाबूजींचे सतत फोन यायचे.
मी यांना विचारायची,
"नेहमी कसा तुमचा गोंधळ-घाई ? तुम्ही गीतं आधी का लिहून ठेवत नाही ?"
त्यावर म्हणायचे,"असं होत नाही. डोक्यात विषय घोळतच असतो. मनात हुरहुर कायमच असते. उमटेल कागदावर सहजच, एकदम. मुद्दाम कशी गाणी लिहून ठेवू ? सूचायला तर हवीत !" ,गीत लिहून झालं, की प्रत्येक गीत मला वाचून दाखवत. मी भाजी फोडणीला टाकत असले तर तिथं येत. म्हणत,"सरकारी शिक्का बसल्याखेरीज आम्हाला पाठविता येत नाही. "
प्रथम मला वाड़्मयाची फारशी आवड नव्हती, पण ह्यांनी ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ सारं समजावून दिलं. टागोरांच्या कवितांचे मराठीत अनुवाद करून त्या समजावून दिल्या.
गीत रामायणाच्या दिवसांत आम्ही खेडोपाडी गेलो, की जणू प्रत्यक्ष वाल्मिकीच येताहेत, या भावनेनं आदतातिथ्य होई. देवमाणसासारखं सडा, ओवाळण, फुलं देउन स्वागत होई. घराघरातील वयस्कर बायकाही ह्यांचे पाय धरत. म्हणत, "तुमच्यातल्या वाल्मिकीचे पाय धरतोय." काहींच्या देव्हार्र्यातही ह्यांचे फोटो होते. गीत रामायणाचे पुस्तक आणि ह्यांच्या फोटोला गंध लावून, फुलं घालून अनेकजण रेडिओपुढे भक्तिभावाने बसून गीत रामायण ऐकत असत.
गीत रामायण हा एकाच कवीने वर्षभर रचलेला, एकाच संगीतकाराने संगीतबद्ध केलेला, वर्षभर अखंडितपणे चाललेला आकाशवाणीच्या इतिहासातील एकमेव, अभूतपूर्व असा संगीत कार्यक्रम ठरला.
पहिल्या गीताबद्दल जो गोंधळ उडाला, तो मला ह्यांनी आकाशवाणीतून घरी आल्यावर सांगितला. ह्यांनी गीतरामायणाचे पहिले गीत लिहिले व बाबूजींकडे दिले. काय झाले कुणास ठाऊक, तो गीताचा कागद काही मिळेना. आकाशवाणीकडून तर दिवस व वेळ ठरलेली होती.
१९५५ च्या रामनवमीला रेडिओवरून पहिले गीत सादर व्हायचे होते. वेळ अगदी थोडा होता. मग यांनी अर्ध्या तासात नवीन गीत लिहून दिले "स्वये श्री रामप्रभू ऐकती ". बाबूजींनी घाईघाईने त्याला चाल लावली. सकाळी दहा वाजता गाणे ध्वनिक्षेपित झाले. पुढे दोन-चार दिवसांनी रेडिओवर व पंचवटीवर पत्रांचा अक्षरशः पाऊस पडला. लोकांच्या पसंतीची पावती भरभरून मिळाली.
गदिमा गौरव | Special Quotes
ग.दि.माडगूळकर(यवतमाळ,साहित्य संमेलनातील भाषणातून)
गीत गायले जाते एवढया अपराधासाठी त्याच्या अंगावरची कवित्वाची भूषणे काढून कशासाठी घ्यायची? काव्यहीन गीते लिहिली जातात,तशी काव्यहीन कविताही पुष्कळ असते.पण छंदात रचलेली एखादी कविता कोणी तालस्वरावर गायली तर तिच्यातील कवित्व नाहीसे झाले असे कसे? माझ्यासारख्या एकाद्या कविला काव्य स्फुरते
तेच छंदासह....