२००३ साली शरद पवारांनी बारामतीत गदिमांच्या नावाने मोठे सभागृह बांधले,त्याच्या उदघाटन प्रसंगी आम्हा माडगूळकर कुटुंबियांना मोठे आग्रहाचे निमंत्रण होते,त्याच वेळी शरद पवारांनी सांगितलेला हा किस्सा.
जेष्ठ गीतकार 'पी.सावळाराम' उर्फ 'निवृत्तीनाथ रावजी पाटील' मराठी चित्रपटातील एक नामवंत व्यक्तिमत्व,'कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेलां','जेथे सागरा धरणी मिळते','गंगा जमुना डोळ्यांत उभ्या का' सारख्या गीतातून ते आपल्याला माहित आहेत.गदिमांचा आणि त्यांचा चांगला स्नेह होता. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील 'येडेनिपाणी' हे 'पी.सावळाराम' यांचे गाव,'क्रांतीसिंह नाना पाटील' ही त्याच गावचे होते.
१९६८ साली पी.सावळाराम ठाणे नगरपालिकेत निवडून आले होते,शरदरावजी पवार त्यावेळेस विधानसभा सदस्य व कॉंग्रेस पक्षाचे सेक्रेटरी होते,गदिमा त्यावेळी साहित्यिकांचे प्रतिनिधि म्हणून विधान परिषदेचे नामनियुक्त सदस्य (आमदार) होते.
मुख्यमंत्री वसंतराव नाईकांनी शरद पवारांना बोलावून घेतले,त्यावेळी गदिमा तेथे उपस्थित होते,नाईकांनी पवारांना सांगितले,
"सावळाराम नगरपालिकेत निवडून आले आहेत,त्यांना नगराध्यक्ष करायचे आहे पण आपले येथे बहुमत नाहीये,दोन मते कमी पडत आहेत,काहीही कर पण त्यांना निवडून आण".
गदिमांनी राजकारणासारख्या कोरडया क्षेत्रातही मुक्त वावर केला होता,ते साहित्यिकांचे प्रतिनिधि म्हणून जवळजवळ १२ वर्षे (१९६२-१९७४) विधान परिषदेचे नामनियुक्त सदस्य (आमदार) होते.ते जेव्हा विधान परिषदेत भाषण करणार असायचे तेव्हा ते ऐकण्यासाठी विधान सभेतील अनेक आमदार खास त्याचे भाषण ऐकण्यासाठी विधान परिषदेत येऊन बसत असत.गदिमांनी स्वातंत्र चळवळीत भाग घेतला होता त्यामुळे त्यांची नाळ त्या वेळच्या कॉंग्रेस पक्षाशी जोडलेली होती तरीपण त्यांच्या मित्र-परिवाराच्या गोतावळ्यात सर्व जणांचा समावेश होता अगदी स्व.यशवंतरावजी चव्हाण असोत,शरदरावजी पवार असोत किंव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असोत सर्वांनाच ते आपले वाटायचे.स.गो.बर्वे,सुशीलकुमार शिंदे,राम नाईक,मनोहर जोशीं सर्वच त्यांच्या परिवाराचेच सदस्य होते.
बहुदा गदिमांनी आपल्या मित्राला हे पद मिळावे अशी गळ मुख्यमंत्र्यांना घातली असणार किंव्हा पी.सावळाराम यांनी गदिमांचा राजकारणी नेत्यांमधला दरारा पाहून तसे सुचवले असेल!.
शरद पवार तेथे दोन दिवस जाऊन राहीले (शरदरावजी पवार म्हणतात .... "मते कमी पडली की याला हाताशी धरा अशी माझी ख्याती त्यावेळेपासूनच होती!"),त्यांच्यापरीने जे राजकारणी डावपेच खेळावे लागतात ते सर्व खेळून त्यांनी शेवटी 'पी.सावळाराम' यांना ठाण्याच्या नगराध्यक्षपदी निवडू आणले!.
शरद पवारांनी 'पी.सावळाराम' यांना गाडीत घातले व मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर घेऊन गेले,तेथे मुख्यमंत्र्यांबरोबर गदिमाही उपस्थित होते,
शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले की पी.सावळाराम निवडून आले,नगराध्यक्ष झाले.गदिमा ते ऐकत होते,ते जागचे उठले व शरद पवारांजवळ गेले,त्यांच्या पाठीवर एक जोरात थाप मारली व म्हणाले...
"बहाद्दरा काय काम केलस!,येडयाचा पाटील ठाण्याचा अध्यक्ष केलास!....."
त्यावेळी ठाणे हे मेंटल हॉस्पटल साठी प्रसिद्ध होते (सध्या ते पुण्यात आहे! ;-) ),कोणी वेड्यासारखे वागत असेल तर लोक त्यावेळी गंमत करताना "याला ठाण्याला पाठवा रे" असे नित्यनियमाने म्हणत असत,त्याचा रेफरंन्स व 'येडेनिपाणी' हे पी.सावळाराम यांचे गाव व सावळाराम पाटील हे नाव याचे गदिमांनी 'येडयाचा पाटील' केले!
"बहाद्दरा काय काम केलस!,येडयाचा पाटील ठाण्याचा अध्यक्ष केलास!....." , तेथे उपस्थित असलेल्या मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांची हसून पुरेवाट लागली असेल!.
गदिमा गौरव | Special Quotes
पं.महादेवशास्त्री जोशी
गीतरामायण म्हणजे आदर्शाचा उत्तुंग पुतळा म्हटला, तर गीतगोपाल म्हणजे त्याच्या भोवतीच बहरलेले कुंजवन म्हणता येईल.तिथे प्रणाम करायचा,इथे विहार!गीतरामायणाची वाणी ही भारलेली आहे.तर गीतगोपालाची वाणी झंकारलेली आहे.गीतरामायण हा मराठी शारदेच्या मखरात बसतांना घालायचा मुकुट तर गीतगोपाल हा तिचा हळदीकुंकुवाला जातांना गळ्यात रुळवायचा रत्नहार म्हणणे
संयुक्तिक ठरेल..