गदिमा नवनित
  • आई सारखे दैवत सार्‍या जगतावर नाही
    म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ,आ,ई
मराठी युनिकोड फॉन्ट
  • तंबाखूची रसाळ पोथी गातो ऐकावी
  • Tambakhuchi Rasal Pothi
  • सुमित्र माडगूळकर | Sumitra Madgulkar


  •   
    तुम्ही तंबाखू किंव्हा चक्क पालीवर गाणे लिहू शकाल?,शिरशीरी आली नं?,आता गदिमांचेच बघा 'या चिमण्यांनो, परत फिरा रे' गाण्यात 'चुकचूक करीते पाल उगाच, चिंता मज लागल्या' किती चपखल पणे शब्द बसला!,पाल ही बिचारी धन्य धन्य झाली असेल.

    आता तंबाखूचे गाणे!,तुम्ही रस्त्यावर नक्की कोणालातरी तंबाखू खाताना पाहिले असेलच,महाशय आधी

    तपकिरी-बदामी रंगाच्या पाकीटातून चिमुटभर तंबाखू काढतात मग छोट्या पारदर्शी प्लॅस्टीकच्या पिशवीतून चुना काढला जातो मग मन लाऊन ती मळली जाते आणि शेवटी मान तिरकी करुन तोंडात तंबाखूचा बार भरला जातो.नंतर कीक-बीक लागते असे म्हणतात बाबा!,हे बघणार्‍या आपले मात्र तोंड मात्र एरंडेल घेतल्यासारखे वाकडे झाले असते कारण आता काही वेळाने 'आनंदी आनंद गडे,जिकडे तिकडे चोहीकडे' म्हणत महाशह पिचकारी उडवायला मोकळे होणार हे आपल्याला माहित असते!.

    गुरुकिल्ली हा असाच गदिमांचा विनोदी चित्रपट यात गदिमांना तंबाखूवर गाणे लिहायचे होते,यासाठी गदिमांच्या मदतीला चक्क आपले देव धाऊन आले व जणू आपले देवच सांगत आहे तंबाखूची रसाळ पोथी ..(गदिमांना आपल्या कोणत्याही देव देवतांचा अपमान करण्याचा हेतू नव्हता हे मुद्दामून सांगतो,हल्ली फेसबूकवरुन लिहीताना भितीच वाटते!,कधी कोणाच्या भावना,सद्भावना,र्दुभावना दुखावल्या जातील कोण जाणे!,१९६६ च्या चित्रपटातले केवळ एक विनोदी चित्रपटगीत तुमच्यापर्यंत पोहोचविणे हाच केळ उद्देश!,बाकी देवदेवतांचा अपमान करण्यासाठी माधुरीचे चित्रकार आहेतच!)

    तर गदिमा 'तंबाखूची रसाळ पोथी गातो ऐकावी...' गाण्यात या अजब गुणांच्या वनस्पती चे गुणगान सुरवात करतात..

    "अजब गुणाची वनस्पती ही सार्‍यांनी खावी
    तंबाखूची रसाळ पोथी गातो ऐकावी"

    आपण लहाणपणी ऐकले असेल की संस्कृत ने आपली वाचा सुधारते पण हरीनामापरी तंबाखूनेही वाचा सुधारते बरका!,ही थोरवी देवांनाही माहित आहे.

    'खा तंबाखू', 'खा तंबाखू' हुकूम देवाचा
    हरीनामापरी तंबाखूने उद्धरते वाचा
    तंबाखूची थोरवी सार्‍या देवांना ठावी

    आता सुरवात जन्मापासून करायला हवी,तंबाखूचे झाड ओळखायचे कसे तर त्याकरता चक्क पंढरपूरचा विठ्ठल आपल्या मदतीला येतो,तो कमरेवर हात ठेऊन काय सांगतो तर तंबाखूचे झाड कमरेइतक्या उंचीचे असते!..

    "पंढरपुरचा विठ्ठल ठेवी कमरेवर हाता
    तंबाखूचे झाड केवढे ते सांगे जगता
    कमरेइतकी उंची त्याची जाणुनिया घ्यावी"

    त्यानंतर आता झाड तर सापडले आता तंबाखूचे योग्य पान कसे ओळखायचे,तर व्यंकटेश समोर ऊभे ते हात पसरुन काय सांगतात तर अहो तंबाखूचे पान तळहातावाणी!.

    "हात पसरतो का व्यंकोबा देव चक्रपाणी
    तंबाखूचे पान म्हणे तो तळहातावाणी
    शाहिराची वाणी तुम्ही पडताळुनी घ्यावी"

    चला आता तंबाखू तर मिळेल पण खायची किती?,बकाणा तर नाही ना भरु शकत!,पडलात ना संकटात?,काळजी नको,आपला विघ्नहर्ता आहे न मदतीला!,गावोगावची गणेशमुर्ती चिमूट कशाला दाखवते अहो ती सांगती तंबाखू चिमूटभर खावी व चिमूटभर द्यावी!,देवघेव व्हावी (म्हणजे परत सोशल नेटवर्कींगच झालं न!,गावोगावी चावडीवर,शहरात पानाच्या टपरीवर तंबाखू देवाण घेवाणीत मोठ्या मोठ्या मैफिल जमतात,चर्चा होतात,अनेकांच्या प्रतिभा जागृत होतात!,तंबाखू देवाण घेवाण एक सोहळाच असतो..ओळख-पाळख थोडीच लागते!)

    "गावोगावची गणेशमुर्ती चिमूट एक दावी
    जगास सांगे ही तंबाखू कशी किती घ्यावी
    चिमूट घ्यावी, चिमूट द्यावी, देवघेव व्हावी"

    आता तंबाखू चे झाड झाले,पान झाले अगदी तंबाखू खाऊन पण झाली,पण सरकारी नियम तो नियम शेवटी 'वैधानिक इशारा' (statutory warning) 'तंबाखू सेवन स्वास्थ के लिये हानिकारक है' द्यायला नको?,हवाच न,यात आपले देव कसे मागे राहतील,इशारा देणार कोण तर सर्वशक्तिमान 'बजरंगबली'!,आपला 'मारुती राया' जो आपला हात उगारुन उभा आहे,तुम्हाला सांगीतले आहे की चिमूटभरच खा,ऐकले नाहीत आणि जास्त खायला लागलात तर तो काय करील तर उगारलेल्या हाताने थोबाडित ठेवून देईल!!!

    "चिमटीहुन जर अधिक खाल तर होईल रे काय ?
    हात उगारुन उभा ठाकला श्री मारुतीराय
    थोबाडित तो ठेवून देईल जाण बाळगावी"

    तर असे हे गदिमांचे गंमतशीर गाणे,वरचे रसभरित वर्णन ऐकून तंबाखूप्रेमी मंडळी एव्हाना बार भरायला गेली पण असतील,पण सर्वांना नम्र विनंती की तंबाखू काही खाऊ नका,स्वत: पण नको व जवळच्या अण्णा,तात्या,आबा,भाऊ,मामा,अक्का अगदी मावशींना पण सांगा!.

    र्दुदैवाची गोष्ट अशी की गदिमा स्व:ता तंबाखू प्रेमी होते व शेवटच्या काळात त्यांना फुफ्फुसाचा कर्करोग झाला,तेव्हा 'जय बजरंगबली!'