गदिमा नवनित
  • दैवजात दु:खें भरतां दोष ना कुणाचा
    पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा
मराठी युनिकोड फॉन्ट
  • ना शिव्या,ना ओव्या!
  • Na Shivya Na Ovya
  • सुमित्र माडगूळकर | Sumitra Madgulkar


  •   
    गदिमांनी १९७७ साली ललित मासिकाच्या दिवाळी अंकात 'ए.क.कवडा' या टोपण नावाने मराठीतील २० सुप्रसिद्ध लेखकांवर विनोदी बिंगचित्रे लिहिली होती,त्या वेळच्या प्रसंगानूसार किंव्हा एकूण त्या लेखकाच्या व्यक्तिमत्वानुसार दोन-चार विनोदी ओळी व त्या लेखकाचे व्यंगचित्र असे त्याचे स्वरुप होते,ती खूप गाजली व हा 'ए.क.कवडा' नक्की कोण अशा चर्चा रंगायला लागल्या होत्या,संपादकांना विचारणा

    झाल्या,पण नाव काही कोणाला कळाले नाही,डिसेंबर १९७७ मध्ये गदिमांचे निधन झाल्यावर संपादकांनी शोकसभेत जाहिर केले की 'ए.क.कवडा' म्हणजे ग.दि.माडगूळकरांचे हे लेखन होते.यातली काही स्मरणात असलेली निवडक बिंगचित्रे तुमच्यासाठी खास!.

    पु.ल.देशपांडे मराठीतील एक दिग्गज लेखक,त्यांचे बंगाली भाषेवर पण तितकेच प्रेम होते,त्यावर गदिमा भाष्य करतात

    "पाया पडती राजकारणी,करणी ऐसी थोर
    मराठीतला तू बिनदाढीचा रवींद्र टैगोर"

    गो.नी.दांडेकर तर दुर्गप्रेमी,चालायची पण त्यांना विलक्षण आवड होती,त्यांच्या बद्दल

    "चाले त्याचे दैव चालते,चढतो,त्याचे चढते
    माळ तुळशीची आणि दाढी कोठे कोठे नडते!"

    कविवर्य मंगेश पाडगावकर,काव्यवाचनाची त्यांची एक वेगळीच शैली आहे,त्याकाळात त्यांच्या काही कविता लिज्जत पापडाच्या जाहिरातीत झळकत असत त्यावर गदिमा चिमटा काढतात

    "तुझ्या वाचने काव्यच अवघे वीररसात्मक झाले
    घेऊ धजती इज्जत कैसी 'लिज्जत पापडवाले'"

    दुर्गाबाई भागवतांबद्दल...

    "जागविले तू शांत झोपल्या वाड़मयीन जगतां
    दुर्गे,दुर्गे,सरले दुर्घट,आता हो शान्ता"

    गोमंतक निवासी कविवर्य बा.भ.बोरकर यांच्या ज्येष्ठ कन्येने एका मद्रासी युवकासी प्रेमविवाह केला होता,त्यावर

    "बोरीच्या रे बोरकरा,लेक तुझी चांगली
    गोव्याहून मद्रदेशी सांग कशी पांगली?"

    राजा निलकंठ बढे उर्फ कवि-गीतकार राजा बढे यांची एक कविता गदिमांच्या वाचनात आली सुंदर कविता होती पण खाली लेखकाचे नाव होते 'रा.नि.बढे' आधी गदिमांना लक्षात येईना की हे कोण लेखक,मग आठवले की अरे हे तर आपले 'राजा बढे',पुढे त्याच सुमारास राजा बढे पंचवटीत आले,त्या वेळी गजाननराव वाटव्यांचे 'राधे तुझा सैल अंबाडा' हे गाणे गाजत होते त्या चालीवर त्यांना बघताच गदिमा गमतीदार पणे मान डोलावत म्हणू लागले...

    "कुणी ग बाई केला? कसा ग बाई केला?
    आज कसा राजा बढे,रानी बढे झाला?"

    रविकिरणी कवितेची थट्टा करीत गदिमा म्हणत

    "गिरीशांची ही गर्द 'आमराई'
    त्यात उघडी यशवंत पाणपोई"

    स्व:तालाही त्यांनी सोडले नाही!,गदिमांना गीतरामायणामुळे 'आधुनिक वाल्मिकी' म्हणत असत,शेवटच्या काळात ते कर्करोगाने आजारी होते,त्यांच्या हातून फारसे लिखाण होत नव्हते,म्हणून स्वतः बद्दलच त्यांनी बिंगचित्र लिहिलं,गदिमांच्या हातात कुर्‍हाड घेतलेल्या व्यंगचित्राखाली लिहिले होते..

    "कथा नाही की कविता नाही,नाही लेखही साधा
    काय वाल्मिके,स्विकारिसी तू पुन:श्व पहिला धंदा?"


गदिमा गौरव | Special Quotes
  • प्रा.रा.ग.जाधव
    माडगूळकरांनी सात आठशे वर्षांची विविध रुपरसांची परंपरा आधुनिक संस्कारांनी पुन्हा सजीव केली आहे.चैत्रबन म्हणजे या पुराण्या काव्यपरंपरेचे एक कलाप्रदर्शनच आहे.
संबंधीत लेख | Related Articles