आपल्या सगळ्यांचे लाडके गीतरामायण ६० व्या वर्षात (हीरकमहोत्सवी) पदार्पण करीत आहे,महाकवी ग.दि.माडगूळकर व संगीतसुर्य सुधीर फडके यांच्या अलौकिक प्रतिभेतून साकारलेल्या गीतरामायणाची वाटचाल १ एप्रिल १९५५ रोजी पुणे आकाशवाणी पासून सुरु झाली.
आज साठ वर्षे झाली तरीही रेडिओ, ग्रामोफोन, वृत्तपत्रे, कॅसेट, टेलिव्हीजन, संगणक, सीडी, इंटरनेट,फेसबुक,मोबाईल अॅप या सर्वच माध्यमातून यशस्वीपणे प्रवास करणारा हा एकमेव कलाविष्कार असावा!.
गदिमा व बाबुजींबरोबर गीतरामायणाच्या निर्मितीत ज्या महान कलाकारांचा वाटा आहे त्यांचा उल्लेख करणे आज अपरिहार्य आहे,संयोजक सिताकांत लाड,गायक-गायिका माणिक वर्मा,लता मंगेशकर,ललिता फडके,मालती पांडे,वसंतराव देशपांडे,गजाननराव वाटवे,राम फाटक,व्ही.एल.इनामदार,सुरेश हळदणकर,बबनराव नावडीकर,चंद्रकांत गोखले,प्रमोदिनी जोशी,मंदाकिनी पांडे,योगिनी जोगळेकर,कुमुदिनी पेडणेकर,सुमन माटे,जानकी अय्यर,संगीत संयोजक प्रभाकर जोग व सौ.जोग,वादक अप्पा इनामदार,अण्णा जोशी,केशवराव बडगे व अनेक दिग्गज कलाकारांच्या अथक प्रयत्नातच गीतरामायणाचे यश सामावले आहे.
वार्ता ही सुखद जधीं पोंचली जनीं
गेहांतुन राजपथीं धावले कुणी
युवतींचा संघ कुणी गात चालला
पुष्पांजलि फेंकि कुणी, कोणी भूषणें
हास्याने लोपविले शब्द, भाषणें
वाद्यांचा ताल मात्र जलद वाढला
वीणारव नूपुरांत पार लोपले
कर्ण्याचे कंठ त्यांत अधिक तापले
बावरल्या आम्रशिरीं मूक कोकिला
दिग्गजही हलुन जरा चित्र पाहती
गगनांतुन आज नवे रंग पोहती
मोत्यांचा चूर नभीं भरुन राहिला
बुडुनि जाय नगर सर्व नृत्यगायनीं
सूर, रंग, ताल यांत मग्न मेदिनी
डोलतसे तीहि, जरा, शेष डोलला
गदिमा गौरव | Special Quotes
कविवर्य कुसुमाग्रज (गदिमा गेले तेव्हा)
महाराष्ट्र सरस्वतीचा लाडका पुत्र काळाने हिरावुन नेला.माडगूळकरांच्या निधनाने मराठी साहित्यातील उत्तम संस्कार मावळला.आणि एक सुंदर संगीत हरपले.विविध रसांवर विलक्षण प्रभुत्व करणारा त्यांच्या सारखा कवी अलीकडच्या काळांत झाला नाही.गीतरामायणाने माडगूळकर चिरंजीव झाले पण मराठीतील विविध रसांचे आणि कवितेतील अपूर्व चैतन्य गेले.