आपल्या सगळ्यांचे लाडके गीतरामायण ६० व्या वर्षात (हीरकमहोत्सवी) पदार्पण करीत आहे,महाकवी ग.दि.माडगूळकर व संगीतसुर्य सुधीर फडके यांच्या अलौकिक प्रतिभेतून साकारलेल्या गीतरामायणाची वाटचाल १ एप्रिल १९५५ रोजी पुणे आकाशवाणी पासून सुरु झाली.
आज साठ वर्षे झाली तरीही रेडिओ, ग्रामोफोन, वृत्तपत्रे, कॅसेट, टेलिव्हीजन, संगणक, सीडी, इंटरनेट,फेसबुक,मोबाईल अॅप या सर्वच माध्यमातून यशस्वीपणे प्रवास करणारा हा एकमेव कलाविष्कार असावा!.
गदिमा व बाबुजींबरोबर गीतरामायणाच्या निर्मितीत ज्या महान कलाकारांचा वाटा आहे त्यांचा उल्लेख करणे आज अपरिहार्य आहे,संयोजक सिताकांत लाड,गायक-गायिका माणिक वर्मा,लता मंगेशकर,ललिता फडके,मालती पांडे,वसंतराव देशपांडे,गजाननराव वाटवे,राम फाटक,व्ही.एल.इनामदार,सुरेश हळदणकर,बबनराव नावडीकर,चंद्रकांत गोखले,प्रमोदिनी जोशी,मंदाकिनी पांडे,योगिनी जोगळेकर,कुमुदिनी पेडणेकर,सुमन माटे,जानकी अय्यर,संगीत संयोजक प्रभाकर जोग व सौ.जोग,वादक अप्पा इनामदार,अण्णा जोशी,केशवराव बडगे व अनेक दिग्गज कलाकारांच्या अथक प्रयत्नातच गीतरामायणाचे यश सामावले आहे.
कुठें चंदना, गौरांगी ती ?
कुंदलते, ती कुठें सुदती ?
कोठें आम्रा, विनयवती ती ?
शहारतां कां वार्यावांचुनि ?
घात-घटी का पुन्हां पातली ?
सीते, सीते, सखे मैथिली !
हांक काय तूं नाहिं ऐकिली ?
येइ, शिळेच्या बसूं आसनीं
पहा लक्ष्मणा, दिसती डोळे
प्रियेचेच ते विशाल भोळे
मृगशावक हें तिचें कोवळें
का याच्याही नीर लोचनी ?
अबोल झाले वारें पक्षी
हरिली कां कुणि मम कमलाक्षी ?
का राक्षस तिज कोणि भक्षी
शतजन्माचें वैर साधुनी ?
पुनश्च विजयी दैव एकदां
घातांवर आघात, आपदा
निष्प्रभ अवघी शौर्यसंपदा
जाइ बांधवा, पुरा परतुनी
काय भोगणें आतां उरलें ?
चार दिसांचें चरित्र सरलें
हे दुःखांचे सागर भरलें
यांत जाउं दे राम वाहुनी
गदिमा गौरव | Special Quotes
लेखक पु.भा.भावे:
वास्तवतेतील गूढत्व व साधुत्व पाहावयासही माणसापाशी एक दृष्टी असावी लागते.माडगूळकरांचे पाशी ही दुर्मिळ दृष्टी आहे.ते नुसते आकाशाकडे पाहत नाहींत तर आकाशतत्त्वाकडे पाहतात.ह्या तात्त्विक दृष्टीनेच त्यांना आशयसंपन्न कथाचित्रे काढण्याचे सामर्थ्य दिले-अगदी दिवाकर कृष्णांपासून चालत आलेली चांगल्या कथांची परंपरा आज श्री.माडगूळकर चालवीत आहेत.