पुण्याला 'बालगंधर्व' थिएटर उभे राहत होते,गोपाल देउसकरांच्या सुंदर चित्रांशी स्पर्धा करणार्या चार ओळी पाहिजे होत्या. पंचवटी गाठली. माडगूळकरांना म्हणालो, "स्वामी, चार ओळी हव्या आहेत ....बालगंधर्वाच्या पोट्रेटपाशी".मागणी संपायच्या आत माडगूळकर म्हणाले ,"असा बालगंधर्व आता न होणे." तेवढय़ात कुणीतरी आले. गप्पागोष्टी सुरु झाल्या. मी समस्यापूर्तीची वाट बघत होतो. तासाभरात निघायचे होते.त्या श्लोकाला
चाल लावायची होती.
उदघाटन -समारंभाच्या प्रसंगी गाण्याच्या गीतांच्या तालमी चालल्या होत्या. त्यांत माडगूळकरांचे "असे आमुचे पुणे" होतेच. तालमीच्या ठिकाणी बाळ चितळे श्लोक घेऊन आला. सुरेख, वळणदार अक्षरात लिहिलेला. बकुळ पंडितला मी चाल सांगितली. रंगमदिराच्या उदघाटनाच्या वेळी रसिकांनी भरलेल्या प्रेक्षागारातले दिवे मंदावले.रंगमंचावर मांडलेल्या बालगंधर्वांच्या 'नारायण श्रीपाद राजहंस' आणि 'स्वयंवरातली रुक्मिणी' अशी दोन दर्शने घडवणार्या त्या अप्रतिम चित्रांवरचे पडदे दोन युवतींनी बाजुला केले , आणि लगेच माडगूळकरांच्या गीताचे गायन सुरु झाल्यावर रसिकांना कळेना , की त्या रंगशिल्पाला दाद दयावी की गीतातल्या शब्दशिल्पाला !. प्रेक्षागारात पुन्हा प्रकाश आला त्या वेळी त्या 'रम्याणि वीक्ष्य मधुरांश्च निशम्य शब्दान्' ह्या अनुभूतीने पर्युत्सुक झालेल्या रसिकांच्या खिशांतले शेकडो हातरुमाल अश्रू पुसत होते .....
गीतांच्या जन्मकाळाशी गुंतलेल्या अशा किती आठवणी....
डेक्कन जिमखान्याच्या टेनिस कोर्टाजवळच्या रस्त्यातून जाताना एका विजेच्या खांबापाशी आलो की आठवते :
रात्रीचे चित्रीकरण आटपून चालत आम्ही दोघे घरी येत होतो. पहाट होत होती,रस्त्यातले म्युनिसिपालटीचे दिवे मालवले.त्या खांबापाशी क्षणभर थांबून माडगूळकर उदगारले,
"विझले रत्नदीप नगरात !"
"आता जागे व्हा यदुनाथ"
गीत भावनेच्या तादात्म्य पावण्याच्या त्यांच्या असंख्य खुणा त्यांच्या गीतातून आढळतात.शब्दयोजनेतले त्यांचे अवधान सुटत नाही. अशी शेकडो गीते त्यांनी रचली. चित्रपटासाठी त्यांनी गाणी लिहिल्यामुळे आमच्या 'आर्डरी' ही विचित्र असायच्या. 'आर्डरी' हा त्यांचाच शब्द. कधीकधी चाल सुचलेली असायची.
"स्वामी,असं वळण हवं."
"फूल्देस्पांडे, तुम्ही बाजा वाजवीत राहावे".
मित्रांच्या नावांची गंमत करणे हा त्यांचा आवडता छंद असायचा. मग मधुकर कुळकर्ण्याला "पेटीस्वारी",राम गबालेला "रॅम् ग्याबल", वामनराव कुळकर्ण्यांना "रावराव"...कुणाला काय , कुणाला काय असे नाव मिळायचे. चाल पेटीवर वाजवत बसल्यावर चटकन त्या चालीचे वजन त्यांच्या ध्यानात येई. मग त्या तालावर झुलायला सुरुवात. बैठकीवर उगीचच लोळपाटणे. पोटाशी गिरदी धरुन त्याच्यावर चिमटय़ात अडकवलेल्या कागदाचे फळकूट पुढय़ात ठेवून कातरायला सुरवात.मग अडकित्याची चिपळी करुन ताल ...नाना तर्हा.एखाद्या अचानक तिथे आलेल्या नवख्याला वाटावे , इथे गीत आकाराला येते आहे, की नुसताच पोरकटपणा चाललाय !. एखादे दांडगे मूल पाहावे तसे वाटत असे.त्यांच्यातला नकलाकार जागा झाला की मग तो मूलपणा पाहावा. खरे तर मानमरातबाची सारी महावस्त्रे टाकून शैशवात शिरलेल्या माणसाचे ते दर्शन असायचे. ह्या स्वभावगत मूलपणाने त्यांना खूप तारलेले होते. प्रापंचिक जबाबदाय्रा फार लवकर त्यांच्या अंगावर पडल्यामुळे विशीतच फार मोठे प्रौढपण त्यांच्यावर लादले गेले होते, त्यातून ही मूलपणाकडची धाव असायची की काय,ते आता कोणी सांगावे ?..
गडकरी गेले त्या वेळी रसिक महाराष्ट्र असाच सुन्न झाला होता म्हणतात. माडगूळकरांना गडकर्यांविषयी अतोनात प्रेम. आम्ही जोडीने केलेल्या प्रवासात गडकर्यांच्या कवितांचेच नव्हे, तर नाटकांतील उतार्यांचे पठण हा आमचा आवडता छंद असायचा. हरिभाऊ आपटे,नाथमाधव,गडकरी ,बालकवी,केशवसुत,फडके,खांडेकर,अत्रे ह्या आधुनिक काळातल्या साहित्यकारांचे मार्ग पुसैतु आम्ही ह्या साहित्याच्या प्रांतात आलो. मी मुंबंईत वाढलो आणि माडगूळकर माडगुळ्यात वाढले,तरी आमच्या साहित्यप्रेमाचे पोषण एकाच पध्दतीने चाललेले होते. गडकर्यांच्या निधनानंतर वर्षभराच्या आतच आमचा जन्म. माडगूळकर माझ्यापेक्षा फक्त एक महिन्याने मोठे, बालपणातले आमचे इतर वातावरण मात्र निराळे होते.
"त्या तिथे, पलिकडे,तिकडे,माझिया प्रियेचे झोपडे" ही कविता प्रथम त्यांच्या तोंडून ऐकल्यावर मी म्हणालो होतो, "महाकवी, तुम्ही लकी !" (माडगूळकर मात्र स्वताला 'महाकाय कवी' म्हणत.) तुमच्या प्रियेच्या झोपडय़ाकडे वळताना त्या वळणावर आंब्याचे वाकडं झाड होतं. आम्ही वाढलो त्या वातावरणात वळणावर जळाऊ लाकडांची वखार ! .
"महाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत.इतर काहीही देण्या-या माणसापेक्षा समाजाला गाणे देणा-या माणसाचे उपकार फार मोठे असतात. Song has longest life अशी एक म्हण आहे.एक गाणे माणसांच्या पिढय़ानुपिढय़ा बांधून ठेवते एवढेच कशाला ?.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंत:करण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली,तमाशाच्या फडात , देवळात ,शाळेत,तरुणांच्या मेळाव्यात,माजघरात,देवघरात,शेतामळ्यात,विव्दज्जनपरिषदेत...
त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे ?. माडगूळकरांचे चिरंजीवित्व गाण्यांनी सिध्द झाले आहे, व्यक्तिश: मला तर माडगूळकरांचे स्मरण करणे माझ्या पंचविशीपासून ते आता साठीकडे वळलेल्या माझ्याच आयुष्याकडे पुन्हा वळून पाहण्यासारखे वाटते. आम्ही काम केलेला एखादा जुना चित्रपटच पाहण्यासारखे.त्यातली माडगूळकरांची भूमिका आणखी खूप पाहायला मिळणार अशी आशा होती. कवितेच्या त्या जिवंत झर्यातून अजून कितीतरी ओंजळी भरभरुन प्यायला मिळणार आहेत अशी खात्री होती. प्राणांन्तिक संकटातून ते वाचले होते. इडापीडा टळली असा भाबडय़ा मनाला धीर होता.आणि अचानक चित्रपटगृहातल्या अंधारात ती बाहेर पडायच्या दरवाजावरची Exit ची लाल अक्षरे पेटावी, आणि "म्हणजे ?,एवढय़ात संपला चित्रपट ?",असे म्हणता म्हणता 'समाप्त' ही अक्षरे कुठल्या रिळाच्या शेवटी लिहिली आहेत हे कुणाला कळले आहे ?. मी चित्रपटव्यवसाय सोडून बेळगावला गेल्यावर माडगूळकर मला म्हणाले होते, "मित्रा, अशी मैफिल अर्ध्यावर टाकून जाणं बरं नव्हे.आम्ही आता काय म्हणावे ? आणि कुणाला म्हणावे ?.
गदिमा गौरव | Special Quotes
लेखक पु.भा.भावे:
वास्तवतेतील गूढत्व व साधुत्व पाहावयासही माणसापाशी एक दृष्टी असावी लागते.माडगूळकरांचे पाशी ही दुर्मिळ दृष्टी आहे.ते नुसते आकाशाकडे पाहत नाहींत तर आकाशतत्त्वाकडे पाहतात.ह्या तात्त्विक दृष्टीनेच त्यांना आशयसंपन्न कथाचित्रे काढण्याचे सामर्थ्य दिले-अगदी दिवाकर कृष्णांपासून चालत आलेली चांगल्या कथांची परंपरा आज श्री.माडगूळकर चालवीत आहेत.