विद्याताई माडगूळकर म्हणजे गदिमांच्या सुविद्य पत्नी,त्यांच्या विषयी थोडसं......
कोल्हापूरच्या सोळंकूरकर मास्तरांचा संगीत मेळा त्याकाळात खूप प्रसिध्द होता,मेळ्यात त्याकाळात गाणार्या गुणवान मुलांची नावे होती सुधीर फडके,राम गबाले,आप्पासाहेब भोगावकर!.मुंबईत संगीत क्षेत्रात धडपडणारे पण कोल्हापूरला या मुलांसमोर भेट देताना ज्यांची 'मुंबईचे नामवंत भावगीत गायक' अशी ओळख करुन दिली जात असे
ते पु.ल.देशपांडे हेही या मेळ्याला नामवंत पाहुणे म्हणून भेट देत असत!.
याच मेळ्यात पद्मा पाटणकर नावाची १४-१५ वर्षांची एक परकरी पोर गात असे,उंच टिपेचा मोकळा आवाज,ताना,हरकती कशा सुर्रकन जायच्या,मेळ्यामध्ये गायले जाणार्या गाण्यांच्या यादीत औंधकर नावाच्या कवीचे नाव गाजत होते.गजानन दिगंबर कुलकर्णी ऊर्फ औंधकर (हे कवी औंधच्या महाराजांची नक्कल फार छान करायचे त्यामूळे त्यांचे नाव कुलकर्णी सोडून औंधकर पडले होते),तर अशा औंधकरांची गीते पद्या व इतर गुणवान मुले सोळंकूरकरांकडे गात असत,इथेच या कवी आणि पद्माचे सूत जुळले आणि पद्मा पाटणकर ची विद्या गजानन माडगूळकर झाली!.
गदिमांचा त्याकाळातला प्रेमविवाह!,लग्नाच्या सुमारास गदिमा एका चित्रपटात भूमिका करत होते व त्यासाठी चकोट करुन शेंडी ठेवणे आवश्यक होते त्यामूळे ऐन लग्नाच्या वेळी गदिमांना टोपी घालण्याशीवाय पर्यायच राहिला नाही!.त्याकाळात लग्नपत्रिकेवर फोटो छापायची पद्धत होती व १९४२ साल असल्यामूळे गदिमा स्वातंत्रलढयात कार्यरत होते त्यामूळे पत्रिकेवर वंदेमातरम असेही लिहिले होते.गंमत म्हणजे,गदिमा देशस्थ ब्राम्हण तर विद्याताई कोकणस्थ ब्राम्हण,ऐन लग्नात भटजी ऊठून पळून जाऊ लागला की देशस्थ आणि कोकणस्थ लग्न पत्रिकेत होऊच शकत नाही शेवटी 'नागूदेव भटजी' नावाच्या ओळखीच्या भटजींनी त्यांना शास्त्राचा आधार घेऊन लग्न कसे जमते हे पटवून दिले व शेवटी लग्न पार पडले!.
त्यात लग्नात पाण्याची टंचाई शेवटी गदिमांच्या मित्रांनी लग्नमंडपा पासून एका विहीरी पर्यंत मोठी रांग लावली व पाणी भरले.या पाणी भरणार्यांमध्ये होते सुधीर फडके,मधुकर कुलकर्णी,पातकर,नेमिनाथ हे गदिमांचे मित्र व सर्व वर्हाडी महिलामंडळ!.
विद्याताईंचा आवाज तर अप्रतिमच होता गदिमांनी लिहिलेले,सुधीर फडक्यांनी संगीतबद्ध केलेले व पहिले रेकॉर्ड झालेले गाणे विद्याताईंनीच गायले होते.लग्नानंतर गदिमा कोल्हापूरातच स्थायिक झाले कारण त्यावेळी मराठी चित्रपटसृष्टी कोल्हापूरभोवती फिरत असे.कोल्हापूरात गदिमांचे शेजारी होते 'मंगेशकर कुटुंबिय' त्याकाळात 'एचएमव्ही' ने विद्याताईंची "चांदाची किरणे विरली" ही ध्वनिमुद्रिका काढली होती,ती खूप गाजत होती.लता मंगेशकर विद्याताईंकडे जायच्या व म्हणायच्या "वहिनी,मी तुमच्या सारखे गाऊन दाखवू?",विद्याताई त्यांच्या आत्मचरित्रात लिहितात...."आणि माझ्यापेक्षा कितीतरी सहजतेने ते गाणं ती म्हणून दाखवायची.तिच्या गोड गळ्यातून ते गाणं ऐकल्यावर हे गाणं माझं की लतांच? असा प्रश्न कधिकधी मला पडायचा".
गदिमांची प्रतिभा बहरावी म्हणून लग्नानंतर मात्र त्यांनी गाणं सोडले व शेवटपर्यंत गदिमांच्या संसाराकडेच लक्ष्य दिले.सुप्रसिद्ध अभिनेत्री सुलोचना तर विद्याताईंची खास मैत्रिण,सुलोचना बाईंचा वहिनिच्या बांगड्या हा चित्रपट खूप गाजला होता,त्या चित्रपटाची तयारी करताना त्या विद्याताईंजवळ राहिल्या होत्या व त्या कशा वागतात याचा अभ्यास करुन त्यांनी त्या चित्रपटातले पात्र रंगविले होते.
अशा या गदिमांच्या गृहिणी-सखी-सचिव विद्याताई!,गदिमा त्यांना प्रेमाने मंदी ही म्हणायचे,आर्थिक मंदी असली की म्हणायचे "माझ्या डोक्यात विद्या आहे आणि खिशात मंदी!",१९९४ साली त्यांचे निधन झाले पण आपल्या "आकाशाशी जडले नाते" या आत्मचरित्राद्वारे त्यांनी गदिमाबरोबरचा सहवास सुरेख शब्दबद्ध केला आहे.
गदिमांच्या शब्दात त्यांच्या विषयी....
"प्रतिभा आणि प्रिया हा माझ्या बाबतीत
ईश्वरी कृपाप्रसाद आहे.
माझ्या जीवनातलं यश माझं नाही,ते तुझं आहे."
गदिमा गौरव | Special Quotes
ग.दि.माडगूळकर(यवतमाळ,साहित्य संमेलनातील भाषणातून)
गीत गायले जाते एवढया अपराधासाठी त्याच्या अंगावरची कवित्वाची भूषणे काढून कशासाठी घ्यायची? काव्यहीन गीते लिहिली जातात,तशी काव्यहीन कविताही पुष्कळ असते.पण छंदात रचलेली एखादी कविता कोणी तालस्वरावर गायली तर तिच्यातील कवित्व नाहीसे झाले असे कसे? माझ्यासारख्या एकाद्या कविला काव्य स्फुरते
तेच छंदासह....